प्रेरणादायी विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb Ambedkar : प्रेरणादायी विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने

वाचाल तर वाचाल हा त्यांचा विचार शिक्षण घेणाऱ्या तरुणाईला योग्य दिशा देण्याचे काम करीत आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून त्यांचे प्रेरणादायी मौलिक विचार वाचले पाहिजेत. ही आजच्या काळाची खरी गरज आहे. टीव्हीनंतर मोबाईलच्या दुनियेत वावरणारा आजचा तरुणवर्ग वाचनाकडे अक्षरशः दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्यासाठी बाबासाहेबांचे विचार फार महत्त्वाचे आहेत. त्यासाठी वाचले तरच आपण वाचू शकतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. तेव्हा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजण्यासाठी त्यांचे विचार वाचले पाहिजेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, जोपर्यंत तुम्ही सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही, तोपर्यंत कायद्याने जे काही स्वातंत्र्य दिले आहे त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. यासाठी प्रामाणिकपणे शिकले पाहिजे. त्याचबरोबर एकाच समाजातील वेगवेगळी गटबाजी पाहायला मिळते, त्या गटबाजीचे विसर्जन करून बाबासाहेबांच्या विचाराने एकत्र यायला हवे. आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करू अशी जिद्द बाळगली पाहिजे.

तेव्हा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती दिनानिमित्त देशातील प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्त्याने वचनबद्ध झाले पाहिजे की, मी बाबासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक राहीन. त्यांचे विचार वाचून मोठे होऊन बाबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले कार्य प्राणपणाने पूर्ण करेन.

१४ एप्रिल अर्थात देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासत देशवासीयांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. भारतासह जगभरात विविध कार्यक्रमांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जात आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरिस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, स्त्रियांचे कैवारी, मजूरमंत्री, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. तसेच भारतीय लोकशाहीतील सर्वात प्रभावशाही व्यक्तिमत्त्व आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्त्वाचे आहे. तेव्हा बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे. खऱ्या अर्थाने तरुणांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे तरच त्यांच्या बुद्धीचा विकास होऊन शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी प्रज्ञा, शील, करुणा, विद्या आणि मैत्री या पंचतत्त्वावर आपले चरित्र बनविले पाहिजे. त्याचबरोबर समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही. समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो हे बाबासाहेबांनी जगाला पटवून दिले आहे. याचे आत्मपरीक्षण देशातील तरुणाईने करणे आवश्यक आहे. यातच त्यांचे हित आहे. तरच खऱ्या अर्थाने देशात विचारक्रांती होईल. विचारक्रांती झाल्याशिवाय आपल्या आचारात फेरबदल होऊ शकत नाही. आचारात फेरबदल करावयास झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे अगदी अगत्याचे आहे. त्यासाठी रूढी, परंपरा व चालीरित यांना तिलांजली द्यावी लागेल. त्यासाठी जर आपल्याकडे दोन रुपये असतील, तर एक रुपयाची भाकरी घ्यावी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्यावे, कारण भाकरी आपल्याला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक आपल्याला कसे जागायचे हे शिकवेल. हा त्यांचा विचार आंबेडकरी समाजाला जागृत करणारा आहे.

तेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी कटिबद्ध होऊया की जीवनात कितीही संकटे आली तरी मी अर्ध्यावर शिक्षण सोडणार नाही. जीवनात जो अभ्यासक्रम निवडला असेल तो प्रामाणिकपणे पूर्ण करेन. कारण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार मी वाचून आत्मसात केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!