चेहऱ्याचे सौंदर्य वाढवणाऱ्या सोप्या टिप्स

आपल्या त्वचेवरील मुरुमं, डाग, डोळ्याखालील काळी वर्तुळं किंवा कोरड्या त्वचेसारख्या समस्यांवर तुम्ही चेहऱ्यावर नुसते कुठलेतरी क्रीम, फेसमास्क, फेसपॅक लावत असाल तर, त्यासर्वांचा तात्पुरता उपयोग किंवा परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल. मात्र या गोष्टी वापरणे बंद केल्यावर, त्वचा पुन्हा आधीसारखी होऊ लागते. असे न होण्यासाठी स्किन केअरबरोबर पोषक आहार असणे; आणि आपल्याला चांगल्या सवयी असणे खूप गरजेचे असते.

स्किन केअरसह त्वचा नितळ, चमकदार आणि सुंदर राहण्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनात या दहा सवयी असल्यास उपयुक्त ठरू शकतात. अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते. थकलेल्या चेहऱ्याला पुन्हा, तजेला देण्यासाठी काय टिप्स आहेत ते पाहू.

सुंदर त्वचेसाठी स्वतःला या १० सवयी लावा :

१. त्वचेला हायड्रेटेड ठेवणे

पाणी पिणे ही सवय आपल्या शरीरासाठी किती महत्वाची आहे, हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे आपल्या त्वचेला तजेला देण्यासाठी, त्याला कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठी दररोज योग्यप्रमाणात पाणी पिणे अतिशय गरजेचे असते.

२. त्वचेचा सूर्यकिरणांपासून बचाव करणे

आपण, सूर्याच्या अतिनील किरणांमुळे आपल्याला त्वचेचे आजार होतात हे जाणून आहोत. त्यामुळे घराबाहेर पडताना, कायम किमान ३० SPF असणारे सनस्क्रीन आपल्या त्वचेवर लावावे. असे केल्याने सूर्यकिरणांचा आपल्या त्वचेवर फार प्रभाव होत नाही; परिणामी त्वचा काळवंडणे, उन्हाचा त्वचेला होणार त्रास यांसारख्या गोष्टी टाळता येऊ शकतात.

३. पौष्टिक आहार

त्वचा उत्तम राहण्यासाठी आपल्या शरीराला आतून पोषण मिळणे गरजेचे असते. त्यामुळे आहारात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने इत्यादी पोषक घटक असणारे पदार्थ घ्यावे. विविध फळं, भाज्या-पालेभाज्या, डाळी, सुकामेवा; मांसाहार करत असल्यास अंडी, मासे यांसारख्या गोष्टींचा समावेश करा. यामुळे केवळ त्वचेलाच नाही तर तुमच्या संपूर्ण शरीराला उपयोग होईल.

४. क्लिंझिंग

दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ करून करून मगच झोपावे. मेकअप लावला असल्यास तो न चुकता काढून टाकावा. यासाठी तुम्ही सौम्य क्लिंझिंगचा वापर करू शकता.

५. मॉइश्चरायझर

त्वचेचे रक्षण करण्यासाठी दररोज, एखाद्या सौम्य मॉइश्चराइजरचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही आणि त्वचा मऊ राहण्यास मदत होते.

६. योग्य प्रमाणात झोप घेणे

शक्यतो ७ ते ८ तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा. रात्री आपण झोपलेलो असतो; मात्र आपले शरीर, आपल्या पेशींना पुनरुज्जीवित करण्याचे काम करत असतात. त्यामुळे आपली त्वचा तरुण दिसण्यास मदत होते. म्हणून योग्य प्रमाणात झोप घेणे महत्वाचे असते.

७. ताण नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.

अतिरिक्त ताणाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे योगा, ध्यान किंवा दीर्घ श्वासोत्श्वास करून आलेला ताण नियंत्रणात ठेवण्याचा प्रयन्त करा.

८. नियमित व्यायाम

व्यायाम केल्याने आपल्या संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा व्यवस्थित/सुरळीतपणे होण्यास मदत होते. ज्याचा फायदा आपल्या सर्व अवयवांना तर होतोच, त्याचबरोबर त्वचा सुंदर दिसण्यासाठीही हे महत्वाचे काम करतो. त्यामुळे आपले आरोग्य आणि त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी नियमित व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा.

९. धूम्रपान करणे टाळावे

धूम्रपान करण्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते. तसेच याचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्वचा सैल पडणे, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे यासारख्या समस्या धूम्रपान केल्याने उद्भवू शकतात. त्यामुळे निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी धूम्रपान करू नये. अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखातून समजते.

१०. मद्यपानाचे सेवन

अति मद्यपान केल्याने त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरदेखील होतो. त्वचा डिहायड्रेट म्हणजेच कोरडी पडून, त्यावर सुरकुत्या येऊ शकतात. तसेच चेहऱ्यावर तुमचे वय दिसू लागते. असे होऊ नये यासाठी, आपले आरोग्य जपण्यासाठी मद्यपानाचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. शक्य असल्यास मद्यपान करणे टाळावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!