इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने अखेर पहिल्या विजयाची नोंद केली. २०१४ व २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे ३ सामने गमावल्यानंतर अनुक्रमे एलिमिनेटर व जेतेपदापर्यंतचा प्रवास केला होता. आजच्या विजयाने आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्यानेही या पर्वातील पहिला विजय मिळवला आणि तोही आनंदीत झाला. फ्रँचायझीने कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिककडे दिल्याने रोहित शर्मा नाराज असल्याच्या आणि या पर्वानंतर संघ सोडण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर या विजयानंतर हार्दिकने अप्रत्यक्षपणे उत्तर दिले.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने २९ धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ५ बाद २३४ धावा केल्या. यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला ८ बाद २०५ धावा करता आल्या. हार्दिक म्हणाला,”आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. आम्ही मनात पक्कं केलं होतं आणि आम्ही स्वतःवर विश्वास कायम राखला होता. आम्ही रणनीतीत काही तांत्रिक बदल केले आणि आता आमचा संघ संतुलित व सेट झालेला दिसतोय. हे संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. ड्रेसिंग रुममध्येही प्रचंड प्रेम मिळतंय, काळजी घेतली जातेय. एकमेकांवर विश्वास ठेवून त्याच्या पाठीशी उभे राहणे, हेच चित्र ड्रेसिंग रुममध्ये आहे.”