मालिकाविश्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या अनेक मालिकांमुळे ती घराघरात पोहोचली. सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. त्यातच आता प्राजक्ताने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने स्वत: पोस्ट शेअर करत निर्णय जाहीर केला आहे.
प्राजक्ता माळीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी असे लिहिण्यात आले आहे. त्यासोबतच तिने याबद्दल सविस्तर पोस्टही लिहिली आहे.
“नमस्कार मी प्राजक्ता श्वेता माळी, काय झालं, अहो हो हो बरोबर नांव ऐकलं तुम्ही, आता आपल्या नावा नंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे, अहो हे मी नाही आपलं सरकार बोलत आहे. “आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे, तितकंच आईचं नाव देखील महत्वाचं आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री “अदिती वरदा सुनील तटकरे ताई यांनी. आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे. तर आहे ना अभिमानाची गोष्ट….. धन्यवाद अदिती तटकरे” अशी पोस्ट प्राजक्ता माळीने केली आहे.