दौंड : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी त्यांचे दौंड शहरातील जुने खंदे सहकारी व सध्या भाजपशी जवळीक असणारे दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख किसनदास कटारिया यांची तब्बल सात वर्षांनी भेट घेतली.
मतदानास ठीक एक महिना बाकी असताना या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने शरद पवार यांनी विरोधकांसाठी गुगली टाकली असून त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) पोटात गोळा आला आहे.
शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड शहरातील ख्रिस्ती बांधवांशी संवाद साधल्यानंतर दौंड नगरपालिकेचे सलग ५० वर्ष नगरसेवक असणारे प्रेमसुख कटारिया यांची शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयात भेट घेतली.
कटारिया मानद सचिव असलेल्या शिक्षण संस्थेची माहिती घेत शरद पवार यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर झालेल्या बंद दाराआड चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी या भेटीमुळे सुप्रिया सुळे यांच्या राजकीय विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे.
सध्या प्रेमसुख कटारिया हे कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी नसले तरी दौंड मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार राहुल कुल यांचे दौंड तालुक्यातील राजकीय मार्गदर्शक म्हणून ते मोठी भूमिका बजावतात.
एकेकाळी शरद पवार यांचे खंदे सहकारी म्हणून ओळख असणारे प्रेमसुख कटारिया हे दोन वेळा दौंड विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. कॅांग्रेस (आय) पक्षाचे तालुकाध्यक्ष व राष्ट्रवादीचे दौंड शहराध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
त्यांनी कॅंाग्रेस – शिवसेना – राष्ट्रवादी कॅंाग्रेस असे पक्षांतर केले. दौंड शहराच्या सर्व घटकांमध्ये प्रभाव असणारे प्रेमसुख कटारिया हे नागरिक हित संरक्षण मंडळ नामक आघाडीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहे. सुनेत्रा अजित पवार यांनी दौंड शहरात प्रचाराची सुरवात करताना २६ फेब्रुवारी रोजी प्रेमसुख कटारिया यांची त्यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली होती.
राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी जुन्या सहकार्यांना न विसरण्याचा लौकिक शरद पवार यांनी दौंड मध्ये कृतीतून पुन्हा दर्शविलेला आहे. मात्र सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी शरद पवार यांनी टाकलेल्या या गुगलीवर कोण बाद होणार ? , हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
२०१६ मध्ये पण टाकली होती गुगली
दौंड नगरपालिकेच्या १५ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या थेट जनतेतून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रेमसुख कटारिया यांची सून तथा अपक्ष उमेदवार शीतल योगेश कटारिया यांनी १२० मतांच्या फरकाने राष्ट्रवादी कॅंाग्रेस पक्षाच्या उमेदवार मिनाक्षी नंदकुमार पवार यांचा पराभव केला होता.
शरद पवार यांनी शीतल कटारिया यांच्या घरी २९ डिसेंबर २०१६ रोजी भेट दिली होती. भेटीच्या दरम्यान शरद पवार यांनी शीतल कटारिया यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचे उपरणे घातल्याने त्यांचा पक्षप्रवेश झाल्याचे मानले जात होते.
मात्र दुसर्या दिवशी प्रेमसुख कटारिया यांनी शीतल कटारिया यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाला नसून सदिच्छा भेटीत अनावधानाने गळ्यात उपरणे टाकल्याचा दावा केला होता. स्वपक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारास पाडणार्यांच्या घरी भेट देत शरद पवार यांनी गुगली टाकली होती व त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे तत्कालीन आमदार राहुल कुल यांच्या पोटात गोळा आला होता.